तिळा उघड

तिळा उघड / खुलजा सिम सिम


'तिळा उघड' हे अरेबियन नाईट्स मधल्या 'अलिबाबा आणि चाळीस चोर' ह्या कथेत वाचले होते. सद्य परिस्थिती काहीशी तशीच आहे. आपण सगळे तिळा उघडण्याची वाट पाहत आहोत. चाळीस चोर मात्र उघडायला फार वेळ घेत आहेत. उघडणाऱ्या गुहेतून हळू हळू काही गमतीजमती बाहेर येताहेत. 


उदाहरणार्थ: १


उघडणाऱ्या कार्यालयात सुरवातीला साधारण 30% हजेरीची परवानगी असून दोन मीटर अंतर ठेवण्याची अट आहे. कॅम्प मधल्या एका मोठ्या सरकारी कार्यालया समोर सकाळी लांब पण विरळ रांग दिसली. ती मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. प्रत्येक चाकरमान्याची सावकाश तपासणी करून आत सोडत होते. ह्या गतीने ते बहुतेक लंच ब्रेक पर्यंत आपल्या टेबलाशी पोहचले असावेत व तातडीने हक्काच्या मधल्या सुट्टीत गंमतीला बाहेर पडले असतील. 


सरकारी कार्यालयांना ही 30℅ हजेरीची अट मात्र फारशी जाचक नसावी कारण जरी पूर्वी 100℅ अटेंडन्सचा शासकीय आदेश असला तरी काम करणारे 30% च असायचे. बाकीचे चहा प्यायला किंवा आपल्या महत्वाच्या निजी व्यवसाया करता कार्यालयाच्या वेळात पसार व्हायचे.


राहिली 2 मीटर ची अट. ही मात्र जरा कठीण आहे कारण ऑफिसमध्ये गोपनीय गप्पा मारणे अवघड होते. शिवाय ज्या ऑफिसमध्ये टेबलाखालून व्यवहार होतो तिथे अडचण निर्माण व्हायची शक्यता असते, पण हुशार व तत्पर कर्मचारी यावर नक्कीच काहीतरी तोडगा काढतील व या अतिमहत्त्वाच्या कामा मध्ये बाधा येऊ देणार नाहीत अशी खात्री आहे.


उदाहरणार्थ: २


"खुलजा सिम सिम" हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे परवलीचे वाक्य आहे याद्वारे काहीही करता येते असे चाळीस चोर सांगतात:


हे वाक्य म्हटल्यावर दिल्लीत देशाच्या गरिबां करता सांपत्तिक पॅकेज तयार करण्यात येते व योग्य पॅकिंग करून, क्रिकेटच्या भाषेत, फुलटॉस द्वारे राज्यांच्या मातब्बर लोकहितवादी पुढार्‍यांपर्यंत पोहोचते करण्यात येते. 


दुसरे उदाहरण म्हणजे हे वाक्य म्हंटल्यावर कर्ज वाटप बिनबोभाट व जलद गतीने होते. आपले क्राऊन जुवे्ल्स जे सध्या लंडन मध्ये लपून बसले आहेत त्यांनी स्वतः खुलजा सिम सिम म्हंटल्यावर राष्ट्रीय बँकांनी त्यांना अमाप कर्जवाटप केल्याची नोंद आहे. या बँका त्यांच्या आयएसओ च्या क्वलिटी पॉलिसी मध्ये जास्तीत जास्त NPA करून दाखवण्याची ग्वाही देतात.


हे वाक्य म्हटल्यावर पूर्वाश्रमीच्या गुन्हेगार व लाच खोर प्रतिस्पर्ध्यांवरचे आरोप व एफआयआर गळून पडतात व त्यांना गरिबांचे कैवारी ह्या नात्याने सत्तारूढ पक्षात प्रवेश मिळून मंत्रीपदही प्राप्त होते.


विजय मुजुमदार

८.६.२०२०

Comments

Popular posts from this blog

सोन्याचे अंड देणारी कोंबडी

Hornet's Nest

The Plastic Lollipop