"दिवस आलापल्लीचे"
दिवस आलापल्लीचे
हे पुरस्कारीत पुस्तक वाचले व फार आवडले म्हणून हे लिहीत आहे.
आधी उज्ज्वलाने वाचले आणि मला वाचण्याची शिफारस केली कारण हे मला नक्की आवडेल ह्याची तिला खात्री होती. ह्या आकाराचे पुस्तक वाचायला मला एक आठवडा तरी लागतो पण मी ते अतिशय वेगाने दोन दिवसातच संपवले. उज्ज्वलाने मात्र तिच्या नेहमीच्या वेगवान पद्धतीने काहीं तासांतच वाचले असावे.
लेखिकेची विचार मांडण्याची पद्धत, भाषेवरील पकड, सुंदर व चपखल शब्दांचा वापर, मनुष्य स्वभावातील खाचाखोचा, कणव, सर्वत्र विनोदाची झालर आणि देवदत्त स्मरण शक्ती प्रकर्षाने जाणवली व आवडली. सगळ्या घटना एका दहा बारा वर्षीय मुलीच्या डोळ्यानी पाहिल्या व स्मृति पटलावर रुजवल्या, अनेक दशकानंतर मनात घोळवल्या आणि पुस्तकाच्या रूपाने बाहेर आणल्या. हे सगळं नैसर्गिक वाटते, कुठेही कृत्रिमपणाचा लवलेशही नाही.
आलापल्लीचे वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करते. गाव, घरे, सॉ मील, रस्त्ते, फॉरेस्ट रेस्ट हाउस, आउट हाउस, क्लब हाउस, शाळा इत्यादी रूप धारण करतात. त्यातली माणसे जिवंत होतात.आलापल्लीत हिवाळा, उन्हाळा, पावसाळयातील वातावरण आणि वनराईतील बदल छान टिपले आहेत. शहरी मुलांची सरपटणाऱ्या, चालणाऱ्या, उडणाऱ्या, चावणाऱ्या, दंश करणाऱ्या प्राण्यांची ओळख व सराव, त्यांचे बंधन मुक्त जीवन एका वेगळ्याच जगात न्हेते. शाळा, मास्तर, त्यांच्या लकबी, परीक्षा, मैत्रिणी, खेळ ह्यांचे रेखाटन ज्यांनी लहान गावातील सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे त्यांना एकदम पटण्यासारखे आहे.
असो, बरेच काही लिहिण्या सारखे आहे पण मी लांबण लावत नाही.
माझ्यापुरते म्हणाल तर ह्या लिखाणात माझ्या आयुष्याचा काही भाग जोडलेला आहे. अलापल्लीशी बराच संबंध आला. पहिला प्रवास आईच्या गर्भात असतांना 1946 साली झाला. वडील नुकतेच डेहराडून (IFC-FRI) मधून प्रशिक्षण संपवून ACF म्हणून आधी रायपूरला CF Stein च्या ऑफिस मध्ये मग चांदयाला रुजू झाले. तेव्हा तिथे वरिष्ठ अधिकारी DFOs, T. McDonald व CE Hewitson होते, भामरागड रस्त्यावर 25 कमी वर फॉरेस्ट सर्व्हे चे काम सुरू होते. माझें आई वडील आधी आलापल्ली रेस्ट हाऊस व नंतर ग्लोरी ऑफ आलापल्लीच्या जंगलात, रेंजर, फॉरेस्टर आणि गार्डस सह बिबटे, वाघ, अस्वलांच्या राज्यातओढयाच्या काठी टेंटस मध्ये राहीले होते. आयडेंटिफिकेशन अँड मार्किंग ऑफ ग्लोरी तेव्हा करण्यात आली. मॅकडोनाल्ड व मुजुमदार यांच्या कार्याचा उल्लेख फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईट वर आहे. हा मॉडेल वर्किंग प्लॅन समजला गेला व डेहराडून च्या प्रशिक्षणात फॉरेस्ट अधिकाऱ्यांना नंतर शिकवला जात असे. मॅकडोनाल्ड 1947 ला इंग्लंडला परत गेले व वडिलांना 27 व्या वर्षी DFO ची नेमणुक मिळाली. 1950 ला त्यांची बदली DFO नागपूर म्हणून झाली व मग भंडारा, डहाणू येथे व 3 वर्षे Conservator of Forests (CF) Nashik Circle नंतर 1963 पासून CF Chanda Circle with HQ at Nagpur. परत आलापल्लीशी संबंध आला.
1947 म्हणजे माझ्या जन्मा पासून तीन वर्षे आई वडिलां बरोबर जंगलात फिरण्याचे योग आले पण ते मला आठवत नाहीत, पण आई कडून ताडोबा, आलापल्ली वगैरेच्या गोष्टी ऐकल्या होत्या (तेंव्हा चंद्रपूर व गढचिरोली हे चांदयात समाविष्ट होते व चांदा हा CP & Berar province चा जिल्हा होता आणि Ngp ही राजधानी होती). माझ्या आठवणीतील आलापल्ली ही कॉलेज मधे असताना 1963 ते 1968 काळात सुट्टीत केलेल्या भेटीतील आहे. वीज नस्तानाची, वीज आल्यानंतरची आलापल्ली, Saw Mill, फॉरेस्ट रेस्ट हाउस, आत जाणार दुतर्फा उंच झाडं असलेला रस्ता, Elephant's Kraal, प्रोटोकॉल प्रमाणे वडिलांना रेसिव्ह करायला आलेले बंद गळ्याचा कोट घसतलेले अधिकारी (DFO, SDO, ACF), हॅट, टाय, क्रॉस बेल्ट, लॉंग बूट घातलेले स्मार्ट रेंजर्स, फॉरेस्टर्स व गार्डस ह्याची सलामी व 7 हत्तींची सलामी व राइड, स्मरणात आहे.
शेवटची भेट 1974 च्या डिसेंबर महिन्यात उज्ज्वला व मी कादरींच्या बरोबर आलापल्ली - भामरागढ परिसरातील टूर केली तेव्हा वडील नागपूरला Managing Director of Forest Development Croporation होते व नंतर पुण्याला 1978 पर्यंत Chief Conservator of Forests, Maharashtra होते.
पुस्तकात लिहिलेल्या व इतर फॉरेस्ट अधिकारी व कुटुंबीय, सर्व श्री बाली, केशवानी, बल्लाळ, सरवटे, ओक, भार्गव, मसलेकर, ह्याच्याशी आत्मीयतेचें संबंध होते. आता मात्र आठवणी पुसट झाल्या आहेत.
शेवटी काही ठळक आठवणी:
नरभक्षक वाघाचा उच्छाद. माडियांच्या भागात वाघाने आदिवासी वर प्राणघातक हल्ले केल्यामुळे वडिलांचे मित्र Maj General Bakshi, Commandant of NDA Khadakwasla & Lt Col. D'Souza यांना आमंत्रण व maneater ची भामरागढ भागात शिकार.
उज्ज्वलाच्या पहिल्याच जंगल सफारीत (कादरीं बरोबर) रेस्ट हाऊस पासून 15 km वर सर्च लाईट मध्ये व्याघ्र दर्शन.
भामरागढ च्या forest log hut मधून संध्याकाळी मी व उज्ज्वला पायी नदीवर गेलो असतांना वाघाशी चुकामूक. आम्ही हट मध्ये आल्यावर 15 मिनिटांनी हेमलकश्यावरुन परतणाऱ्या जीप मधील कादरीना नदीजवळ त्याच जागी वाघ दिसला.
तरुण, तडफदार, नुकतेच डेहराडूनहून आलेले ACF श्री पाटील ज्यांनी आमचा भामरागढ येथील मुक्काम सुखद केला त्यांचे सेरेब्रल मलेरियांने दोन महिन्यात दुःखद निधन.
विजय मुजुुुमदार
Comments